नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (रविवारी) नवव्यांदा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी शिक्षण, शेतकरी, गरीब जनता, एससी-एसटी यांच्यावर विशेष लक्ष देण्यावर भर दिला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बायोफार्म सेक्टर, सेमीकंडक्टर सेक्टरसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. सरकारने केलेल्या या घोषणांमुळे काय स्वस्त आणि काय महाग होणार याची यादी समोर आली आहे.
हे देखील वाचा : Union Budget 2026: अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची रेल्वेबाबत मोठी घोषणा; मुंबई, पुण्यासह ‘या’ मोठ्या शहरांना होणार फायदा
केंद्र सरकारच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून कॅन्सरची औषधं, मधुमेहाची औषधं, कपडे, क्रीडा साहित्य, मोबाईल फोन, ईव्ही बॅटरी ,सौर पॅनेल, सीएनजी, वैद्यकीय उपकरणे, एलसीडी, एलईडी, भारतात बनवलेले कपडे, ईव्ही वाहने, मोटारसायकल, फ्रोझन मासे, ईव्ही लिथियम बॅटरी, वैद्यकीय उपकरणे, लिथियम आयन बॅटरी आणि अपघात विमा स्वस्त झाला आहे. तर इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, बूटं, खनिज, दारु आणि पीव्हीसी फ्लेक्स शीट्स हे महाग झाले आहेत. यामुळे ग्राहकांना काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी झटका बसला आहे.
हे देखील वाचा : Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
रोजगाराच्या संधी वाढणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारने गेमिंग आणि कंटेंट निर्मिती क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात अर्थमंत्री सीतारामन यांनी इनोवेशन आणि तंत्रज्ञान हे विकसित भारताचे सर्वात मोठे इंजिन असल्याचे सांगत १५०० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये एबीजीसी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जाणार आहेत. यामुळे १० लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये तरुणांना उद्योगासाठी तयार कौशल्ये प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण आणि व्यावहारिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाणार असून, करिअर पर्याय म्हणून कंटेंट आणि गेम डेव्हलपमेंटला बळकटी देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना गेम डिझाइन, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचे प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे देखील वाचा : Union Budget 2026: भारत विकास, सुधारणा आणि स्थिरतेच्या मार्गावर – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन





