मुंबई | Mumbai
विधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर महायुतीत सुरू झालेल्या अंतर्गत धुसफुशीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट हस्तक्षेप केला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सार्वजनिकरीत्या सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबवण्याचे निर्देश त्यांनी आपल्या पक्षातील नेते, प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मित्रपक्षांवर माध्यमांसमोर टीका करू नका, वाद वाढवू नका आणि महायुतीतील समन्वय बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशी स्पष्ट सूचना शिंदे यांनी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत दिले आहे.
निवडणुकीतील निकालांचे महायुती म्हणून आत्मपरीक्षण करण्याबरोबरच झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवालही मागवण्यात आला असून महायुतीत वितुष्ट निर्माण होणार नाही आणि अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना मिळणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. दुसरीकडे महाविकास आघाडीने तीन जागा जिंकत आघाडी घेतली. विशेषतः नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघातील निकालांनी सत्ताधारी महायुतीला धक्का बसला.
बद्रीनाथजवळ ६ प्रवाशांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं; बचावकार्य सुरु
या निकालानंतर भाजपमधील काही नेत्यांनी शिंदेसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. पुण्यात भाजप उमेदवाराला अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला. काही ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने महायुतीच्या मतांचे विभाजन झाल्याची चर्चा सुरू झाली.
‘दोस्तीत कुस्ती नको’; शिंदेंचा नेत्यांना स्पष्ट संदेश
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महायुतीतील वाद सार्वजनिकरीत्या वाढवू नका, अशी सूचना त्यांनी केली. मित्रपक्षांशी समन्वय ठेवून काम करा. अंतर्गत मतभेदांचा फायदा विरोधकांना होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे त्यांनी सांगितले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सध्या माध्यमांसमोर मित्रपक्षांवर टीका करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. वरिष्ठ पातळीवर या विषयावर चर्चा केली जाईल; तोपर्यंत सार्वजनिक आरोप-प्रत्यारोप टाळावेत, अशी भूमिका शिंदे यांनी घेतल्याचे समजते.
पराभवाची कारणे शोधण्यासाठी अहवाल मागवला
विधान परिषद निवडणुकीत महायुती म्हणून काम करताना नेमक्या कोणत्या चुका झाल्या, कोणत्या ठिकाणी समन्वयाचा अभाव राहिला आणि स्थानिक पातळीवर कोणत्या त्रुटी निर्माण झाल्या, याचा तपशीलवार अहवाल एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांकडून मागवला आहे. या अहवालांचा आढावा महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत तसेच वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. निवडणुकीतील निकालांचे संयुक्तपणे विश्लेषण करून भविष्यात अशा चुका टाळण्यावर भर दिला जाणार आहे.




