नाशिक । प्रतिनिधी
राज्यात ऐन सणासुदीच्या काळात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुढीपाडव्यावर पावसाचे सावट असून नाशिकला जिल्ह्याच्या काही भागात ’येलो अलर्ट’ असल्याचा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठ, इगतपुरी विभागीय कार्यालयाने वर्तवला आहे.
गुरुवारी (दि.१९) नाशिक जिल्ह्यासह घाट माथ्यावर ’येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे ३०-४० किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. बुधवार दि. १८ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल. यामध्ये प्रामुख्याने अमरावती, अकोला, नागपूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
१८ मार्च रोजी विदर्भातील सहा जिल्ह्यांत किरकोळ गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह जळगाव, धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी रात्रीचा उकाडा आणि उष्णता जाणवेल. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव आणि लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.१८ मार्चपासून मुंबईसह कोकणात हलक्या सरी कोसळू शकतात. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
शेतकर्यांनी खबरदारी घ्यावी
राज्यात एकाच वेळी उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट उभे ठाकले आहे. याचा मोठा फटका काढणीला आलेल्या पिकांना आणि फळबागांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत. तसेच नागरिकांनी बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.





