नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) यांच्या काळ्या कृत्यांवर कारवाईचा (Action) गाजावाजा करत शासन फास आवळत असल्याचा दावा करत असतानाच, दुसरीकडे त्याच खरात यांनी मातीमोल किमतीत घेतलेली जमीन आता सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या रिंगरोड प्रकल्पात संपादित होत असल्याने मोठा आर्थिक फायदा होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाथर्डी आणि गौळाणे (Pathardi and Gaulane) येथील तब्बल १०२ गुंठे जमिनीपोटी खरात कुटुंबाला सुमारे तीन कोटी रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbhmela) २०२७ साठी प्रस्तावित ६६ किलोमीटर रिंगरोडच्या संभाव्य मार्गावर आधीच जमिनी खरेदी करून ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता त्याच जमिनींना कोट्यवधींचा मोबदला मिळणार असल्याने शासन-प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेला अशोक खरात आणि त्याच्या संपर्कातील एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने संगनमताने रिंगरोडलगत जमीन खर दी केल्याचा आरोप केला जात आहे. पाथर्डी परिसरातील सुमारे ३१८० चौ. मीटर (३१ गुंठे) जमीन खरात यांची मुलगी सृष्टी खरात आणि संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे काही लाख रुपयांत खरेदी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, ही खरेदी रिंगरोडचा मार्ग निश्चित होण्यापूर्वीच करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आता त्याच जमिनीला रिंगरोडसाठी पाचपट दराने मोबदला मिळत असून, तिची किंमत दीड कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
हे देखील वाचा : Nashik News : पुरोगामी महाराष्ट्राला भोंदूगिरीचा विळखा; दोन महिन्यांत पस्तीस बाबा गजाआड
खरात यांचे जाळे केवळ एका व्यवहारापुरते मर्यादित नसल्याचेही समोर आले आहे. गौळाणे गावातील गट नंबर ४७/२ मध्ये अशोक खरात यांच्या नावे ४० गुंठे तर पत्नी कल्पना खरात यांच्या नावे ३१.२० गुंठे जमीन असल्याची नोंद आहे. या ७१.२० गुंठे जमिनीचाही मोठा भाग रिंगरोड प्रकल्पासाठी (Ring Road Project) संपादित होत असून, त्यासाठी कोट्यवधींचा मोबदला मिळणार आहे. पाथर्डी आणि गौळाणे येथील मिळून १०२ गुंठे जमीन थेट रिंगरोडमध्ये जात असल्याने या संपूर्ण व्यवहाराबाबत संशय अधिक गडद झाला आहे. विशेष म्हणजे, रिंगरोडच्या संभाव्य मार्गापासून ० ते १००० मीटर अंतरात खरात व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर तब्बल १० ठिकाणी शेतजमीन आणि १२ ठिकाणी प्लॉट असल्याची माहिती समोर आली आहे.
गौळाणे परिसरातील जमिनीच्या बदल्यात अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात यांना सुमारे ८२ लाख ८३ हजार रुपयांचा मोबदला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पाथर्डी येथील जमिनीपोटी तृप्तवाला खरात आणि सृष्टी खरात यांना तब्बल १ कोटी ८२ लाख रुपये मिळणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती आहे. एकूणच रिंगरोड प्रकल्पातून खरात कुटुंबाला सुमारे तीन कोटी रुपयांचा लाभहोणार असल्याने शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुद्दे
- खरेदी आधी… मोबदला नंतर !
- पाथर्डी येथे ३१ गुंठे जमीन काही लाखांत खरेदी
- रिंगरोडचा मार्ग निश्चित होण्यापूर्वी व्यवहार
- आता त्याच जमिनीला दीड कोटींपेक्षा अधिक किंमत
- गौळाणे येथे ७१.२० गुंठे जमीन संपादित
- एकूण १०२ गुंठे जमिनीपोटी सुमारे ३ कोटींचा मोबदला
- रिंगरोडलगत कुटुंबीयांच्या नावावर २२ मालमत्तांची नोंद
हे देखील वाचा : Nashik News : ट्रॅफिक पार्कला अखेर ‘ब्रेक’! अपमानास्पद वागणुकीमुळे माघार – नाशिक फर्स्ट





