मुंबई | Mumbai
नीट पेपरफुटीप्रकरणी (Neet Paper Leak) संसदेवर धडक देणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांवर काल (सोमवारी) दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक युवक आणि युवती जखमी झाल्या आहेत. त्यामुळे देशभरातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच कालच्या दिल्लीतील (Delhi) संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, “लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे . मात्र संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना ते पाऊल उचलावे लागले. पोलिसांनी लाठीमार केला नसता, तर काही अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या” असे देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले, मोदींना विद्यार्थ्यांचे बळी घ्यायचे आहेत का? अभिजीत दीपकेंचे सरकारवर गंभीर आरोप
पुढे ते म्हणाले की, “दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन (Student Protest) हे ‘चेहरा नसलेले’ (फेसलेस) आणि नेतृत्वहीन आहे. अशा आंदोलनांचा फायदा घेऊन काही समाजकंटक प्रवृत्ती स्वतःचा अजेंडा पुढे रेटत आहेत. यातील अनेकांना नीट परीक्षा काय आहे किंवा ती कधी झाली, याचीही माहिती नाही. केवळ अराजकता निर्माण करणे हाच त्यांचा हेतू आहे”, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले.
राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “दिल्लीतील या आंदोलनाचा वापर करून काही राजकीय पक्ष आणि विविध संघटना आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या पक्षांना जनतेने नाकारले आहे, ते यातून पुनरागमन शोधत आहेत. आंदोलनात चांगल्या भावनेने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मी दोष देणार नाही, मात्र त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही ‘हौशे-नवशे-गौशे’ आपला स्वार्थ साधत आहेत” असेही त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Sadabhau Khot : आमदार सदाभाऊ खोतांचे जंतरमंतरवरील आंदोलकांबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, “या आतंकवाद्यांना…”
हिंसाचार अयोग्य, परवानगी घेऊन आंदोलन करावे
विनापरवानगी आंदोलन करणे, पोलिसांच्या गाड्या उलटवणे, गाड्यांची तोडफोड करणे आणि दगडफेक करणे हे कृत्य अत्यंत चुकीचे आहे. राजकीय अशांतता निर्माण करणाऱ्यांवर आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही सरकारला आपल्याच नागरिकांवर किंवा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला आवडत नाही. कालच्या प्रसंगी पोलिसांनी मोठा संयम दाखवला, मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शेवटी पोलिसांना नियंत्रण मिळवणे गरजेचे ठरले. त्यामुळे भविष्यात जर कोणी योग्य परवानगी घेऊन आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार असेल, तर त्याला नक्कीच परवानगी दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी शेवटी स्पष्ट केले.




