मुंबई | Mumbai
अजित पवार यांचा विमान अपघातात २८ जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यानंतर अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार हे दिवंगत अजितदादांच्या विमान अपघातावर वारंवार शंका उपस्थित करत आहेत. अपघाताचा घटनाक्रम आणि एका महिन्यानंतर यासंबंधीत चौकशी करणाऱ्या विविध संस्थांच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले आहे. कुणाच्या तरी दबावाखाली हा प्रकार घडल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावरून प्रश्न उपस्थित केल्यानंतर, आता रोहित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यातील एका जीवघेण्या प्रसंगाचा गौप्यस्फोट केला आहे.
रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित केले. डीजीसीएच्या अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या अहवालाची चिरफाड करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. या दरम्यानच त्यांनी एकनाथ शिंदे यांचाही घातपात होणार होता का, असा सवाल केला आहे.
एकनाथ शिंदेबाबत रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
VSR कंपनीच्या काराभाराबाबत रोहित पवार यांनी घणाघाती टीका केली. व्हीएसआर कंपनीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीव धोक्यात आणल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. “कोणतेही विमान कुठेही जात असेल तर फ्लाईट प्लान द्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय प्रवास असेल तर दुसऱ्या देशांची परवानगी घेतली जाते. जर परवानगी घेतली नाही तर विमान पाडले जाऊ शकते. एकनाथ शिंदे दावोसला जात असताना असाच काही प्रकार घडला. शिंदे यांचे विमान इराणमधून गेले. त्यावेळी इराण आणि इराक दोन्ही देशांची संमती VSR ने घेतली नव्हती. त्यामुळे तुम्ही वळला नाहीत तर तुमचे विमान पाडण्यात येईल असे सांगण्यात आले होते. ज्यानंतर विमान इराकमार्गे वळवण्यात आले पण तिथेही असेच सांगण्यात आले होते. मग बहारिनला जाऊन विमान उतरवले गेले तिथे तीन तास थांबल्यावर संमती मिळाली. असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचा अनुभव
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचे विमान दावोसला चालले होते. त्यावेळी VSR कंपनीने इराण आणि इराकची संमती घेतली नव्हती. आंतराराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी ही संमती आवश्यक असते. एकनाथ शिंदेंचं विमान इराण आणि इराक वरुन या कंपनीने कसे नेले? बहारिनला त्यांचे विमान उतरवावे लागले, त्यानंतर संमती घ्यावी लागली आणि मग त्या विमानाचे उड्डाण झाले. आणखी उशीर झाला होता तर इराणच्या लढाऊ विमानांनी ते विमान पाडले असते. ही माहिती आमच्याकडे आली आहे. याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेंना जाऊन तुम्ही विचारु शकता, याबाबत काही कागदपत्रे माझ्याकडे आली आहेत असाही दावा रोहित पवार यांनी केला.
या कंपनीने उपमुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात घातला होता का? असा प्रश्न निर्माण
रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी VSR कंपनीच्या कारभाराला जबाबदार धरले आहे. “या कंपनीने उपमुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात घातला होता का? असा प्रश्न निर्माण होतो. ज्याप्रमाणे अजित पवारांच्या विमानाबाबत प्रश्नचिन्ह आहे, तसाच काहीसा प्रकार एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडणार होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.




