नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलेला जाळ्यात ओढणारा ‘चमत्कारी’ अशोककुमार एकनाथ खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याच्या पाशवी कृत्याने महाराष्ट्र हादरला आहे. एका महिलेच्या धाडसामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेले त्याचे ‘वासनाकांड’ उजेडात आल्याने त्याला बुधवारी (दि. १८) अटक (Arrested) करण्यात आली, न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. जप्त केलेल्या पेनड्राईव्हने पोलिसांच्याही (Police) पायाखालची वाळू सरकली आहे. कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात हा प्रकार घडला.
हे देखील वाचा : Nashik Crime : मंत्र्यांचे भविष्य सांगणाऱ्या ‘स्वघोषित कॅप्टन’ला लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक; पोलिसांना सापडले तब्बल ५८ व्हिडीओ
सिडकोत (Cidco) राहणाऱ्या २८ वर्षीय पीडितेचा विवाह जुळत नसल्याने तिच्या मेहुण्याने ऐकीव माहितीवरुन मार्च २०१९ मध्ये खरातकडे नेले. स्वतःला दैवीशक्ती प्राप्त असल्याचे आणि मंत्र-तंत्राद्वारे समस्या सोडवू शकत असल्याचा दावा संशयित खरातने केला. सन २०२० मध्ये करोनामुळे तिचा विवाह कुटुंबियांनी स्थगित केला. जुलै २०२१ मध्ये पीडितेचे लग्न ठरले. तेव्हा गळ्यात खडा बांधण्यासाठी तिला दिला, महाविद्यालयीन शिक्षणामुळे तिने काही दिवसांनी तो खडा काढला. त्यानंतर तिचे लग्न मोडले. परिणामी, खडा काढल्याने लग्न मोडल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांना वाटले. पुन्हा ५० हजारांचा एक खडा खरातने पीडितेला दिला. नव्याने लग्न ठरल्यावर होणार्या पतीसह पीडिता तेथे गेली.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘स्वघोषित कॅप्टन’चा धक्कादायक कांड; ऑफिसबाहेर लोकांच्या रांगा तरीही महिलेसोबत…
सिन्नरच्या मंदिरात पूजा करण्याचे सांगून २८ हजाराचे दोन खडे खरातने दिले. खडा काढला तर लग्न मोडेल, विधी न केल्यास होणारा पती मरेल, अशी भीती घालून खरातने पीडितेवर मानसिक दबाव आणला. लग्नानंतर सन २०२२ मध्ये खरातने पीडितेला प्रसादाच्या नावाखाली पेढा आणि खारट कडवट चवीचे पाणी प्यायला दिले. पीडितेला गुंगी आल्यानंतर बलात्कार केला. लग्नानंतर सन २०२३ मध्येही पीडितेच्या पतीला चेंबरबाहेर बसवून संशयिताने तिच कृती केली. एकावेळी पीडितेला शारीरिक इजा होत रक्तस्त्राव देखील झाला. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत आशीर्वाद देण्यासह कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या पतीला ठार मारीन, “तुझे चारित्र्य खराब करून आयुष्य उद्ध्वस्त करीन, असे धमकावून संशयिताने पीडितेवर वारंवार बलात्कार केला.
हे देखील वाचा : Nashik Ashok Kharat Crime : सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केल्यानंतर रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मला कल्पना…”
१५ मार्च २०२६ रोजी पीडितेच्या मेव्हण्याला खरातच्या भोंदूगिरीबद्दल समजले. त्यांनी विश्वासात घेतल्यावर पीडितेने आपबिती सांगितली. त्यानुसार १७ मार्च रोजी पीडितेने सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली, फिर्याद देताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयिताला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने खरातच्या कर्मयोगीनगरातील ‘तृप्तबाला’ बंगल्यात छापा टाकून अटक केली. तपासात खरातच्या कार्यालयातून पेनड्राईव्ह आणि काही डिजिटल पुरावे सापडले आहेत. या हायप्रोफाईल बाबाचे राज्यात व परराज्यात असंख्य ‘भक्त’ असून त्याच्याविरोधात पूर्वी गंभीर स्वरुपाच्या तक्रारी राज्यातील पोलीस ठाण्यांत होत्या. मात्र त्याच्यावर कारवाई झाली नाही. नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी (Nashik City Police) हिंमत दाखवून खरातचा ‘खरा’ चेहरा जगासमोर आणला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यात काही पीडित महिला उद्योजिका, व्यावसायिका, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, वरिष्ठ सरकारी अधिकारी व उच्चशिक्षित तरुणी खरातच्या वासनेचे बळी पडल्याचा दावा ‘अंनिस ने केला आहे. अटकेनंतर यूनिट एकमध्ये खरातला महाप्रसाद वाढण्यात आल्याचे कळते.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : अत्याचाराचे आरोप असलेल्या अशोक खरातची बड्या नेत्यांसोबत उठबस; फोटो आले समोर





