मुंबई | Mumbai
माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाघमारे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ, अभ्यासू व वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
कोण होते डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे?
मराठवाड्यातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावली होती. केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर राजकारणातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता.
११ नोव्हेंबर १९३४ रोजी जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून पदवी (BA) घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एम.ए. पूर्ण केले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी.सह एल.एल.बी. आणि एल.एल.एम. सारख्या कायद्याच्या पदव्याही मिळवल्या. त्यांना पंजाबी विद्यापीठ, पटियाला तर्फे ‘डी.लिट’ ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी राज्यात व देशात स्वतंत्र ओळख निर्माण केली.
डॉ. वाघमारे हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे संस्थापक व पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली.
शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतभर ओळख असलेल्या ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून डॉ. वाघमारे सर ओळखले जातात. स्पर्धात्मक व निकालाभिमुख अभ्यासपद्धती, शिस्तबद्ध अध्ययन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची संकल्पना त्यांनी लातूरमध्ये रुजवली.
डॉ. वाघमारे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्य सभेवर निवडून गेले होते. राज्यसभेतील कार्यकाळात त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडली. तसेच लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला, असा शोक मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि, लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.




