छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
नाशिक येथील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणात निदा खानला पोलिसांनी अटक केली आहे. ती मागील २७ दिवसांपासून फरार होती. नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने निदा खानला संभाजीनगरमधून अटक केली. या अटकेनंतर आता याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी थेट MIM आणि नेते इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर त्यांनी शुक्रवारी (8 मे) मध्यांसमोर स्पष्टीकरण दिले.
एखाद्यावर आरोप झाले म्हणजे तो दोषी ठरत नाही
यावेळी इम्तियाज जलील यांनी निदा खान हिच्याबाबतही प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे दिली. एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आरोप करण्यात येतो, तेव्हा कोर्ट त्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत तो निष्पाप असतो. यू आर ट्रिटेड इनोसंट, अनटील प्रुव्हन गिल्टी, हे न्यायव्यवस्थेचे तत्व आहे. त्यामुळे एखाद्यावर आरोप झाले म्हणजे तो दोषी ठरत नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तोपर्यंत त्या मुलीला अधिकार आहे की, ती जामिनाची मागणी करु शकते. ही कायदेशीर तरतूद आहे. सत्र न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन नाकारला म्हणून ती लगेच गुन्हेगार ठरत नाही, तिला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
“मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही
“जेव्हा आरोप होतात, तेव्हा तो आधी न्यायालयात सिद्ध करावा लागतो. माझ्यावर कुणीतरी आरोप केले म्हणून मी दोषी ठरत नाही. नाशिक पोलीस सर्व गोष्टीचा तपास करत आहेत. आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत कोणी आरोपी नसते.” असे म्हणत MIM चे नेते इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही. मी थेट पोलिसांना उत्तर देईल.” असे म्हणत त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका केली.
Nida Khan: मोठी अपटेड! निदा खानला आसरा देणं त्या AIMIM नगरसेवकाला भोवणार? नाशिक पोलिसांकडून नोटीस
जलील पुढे म्हणाले, “निदा खान विरोधात दाखल झालेली एफआयआर जर तुम्ही वाचली, त्यात निदाचा रोल काय आहे? हे बघितलं तर तुम्हालाही कळेल, यात काहीही नाही. जेव्हा मुलींनी (निदा खान) मला सांगितलं, तेव्हा मी तिला सांगितलं, तुझी काही चूक झाली असेल तर मी तुझ्यासोबत उभं राहणार नाही, तू काहीच केलं नसेल, तर मी उघडपणे सांगतो, आम्ही पूर्ण ताकदीने तुझ्यासोबत उभं राहू, आपल्यालाही माहीत आहे, शेवटी न्यायप्रणाली आपला न्याय देईल, आम्हाला विश्वास आहे की तिला न्याय मिळेल.”
इम्तियाज जलील म्हणाले की, त्या मुलीविरोधात लूकआऊट नोटीस निघालेली नाही. तिने काही हत्या केली असती, दहशतवादी घटनेशी संबंध असता तर पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली असती. एका एफआयआरमध्ये नाव आले आहे, तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. पण तिने मोठा दरोडा टाकल्याप्रमाणे, हत्या केल्याप्रमाणे वागवले जात आहे. पोलिसांनी एफआयआर केला असेल तर नियमाप्रमाणे कारवाई करतील. मी पोलिसांनाही तिची भूमिका काय? विचारणार आहे. माझ्या लोकांनाही विचारणार आहे,” असे त्यांनी म्हटले.
“कोणावरही आरोप होतो तेव्हा त्या व्यक्तीला न्यायालयात जाऊन जामिनाची मागणी करण्याचा अधिकार असतो. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला म्हणजे ती मुलगी दोषी ठरत नाही. यानंतर उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवाने मागील अनेक वर्षांपासून मीडिया ट्रायलमध्ये अनेकांवर केसेस लावण्यात आले आहेत,” असा दावाही त्यांनी यावेळी केला.





