नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी घेतलेल्या दोन दिवसांच्या शटडाऊननंतरही तिसऱ्या दिवशी निम्म्या नाशकात (Nashik) पाणीपुरवठा (Water Supply) ठप्पच राहिल्याने नागरिकांचा (Citizen) संताप अनावर झाला. ऐन उन्हाळ्यात नियोजनशून्य कारभारामुळे पाणीटंचाई तीव्र झाली असून, टँकर व जार पाण्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले.
हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त
नाशिक महानगरपालिका प्रशासनाने (Nashik Municipal Corporation Administration) शनिवारी-रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवत दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. मात्र, दोन दिवसांचा कालावधी मिळूनही सुमारे ५० टक्केच कामे पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोमवारीही अनेक भागात पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही. पाणीटंचाईचा फायदा घेत टँकरमाफियांनी अक्षरशः लूट सुरू केली आहे. एरवी १,६०० रुपयांचा टँकर थेट ५ हजारांपर्यंत विकला जात असून, छोट्या टँकरसाठी ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी ६० रुपयांना मिळणारा पाण्याचा जार १५० ते २०० रुपयांपर्यंत विकला गेला. मागणी वाढल्याने ‘वेटिंग’वर टँकर मिळत असल्याचे चित्र शहरभर दिसले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!
शहरातील अनेक भागांतील बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना पूर्णपणे टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः सिडको, पंचवटी, नाशिकरोड, सातपूर भागात नागरिक पाण्यासाठी हंडे घेऊन फिरताना दिसले. काही ठिकाणी पैसे देण्याची तयारी असूनही पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पाण्याअभावी जार पाण्याची मागणी प्रचंड वाढली. नेहमी ५०-६० जार विक्री होणाऱ्या ठिकाणी हा आकडा थेट ३००-३५० पर्यंत पोहोचला. वाढत्या मागणीमुळे अनेक विक्रेत्यांनी दर वाढविल्याने नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागले.
हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : ‘सन्मानयुग’ च्या नावे ‘कलंकयुग’; एरंडेच्या ‘त्या’ क्लिप्समध्ये अनेक संसार पणाला
पाणीपुरवठा विभागाकडून गंगापूर (Gangapur) हेडवर्क्स, नाशिकरोड आणि गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रांवरील मोठ्या पाइपलाइनचे क्रॉस कनेक्शन आणि गळती दुरुस्तीची कामे सुरूच असल्याने संबंधित भागात पुरवठा पूर्णपणे बंद राहिला. कामे पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दोन दिवसांचा शटडाऊन घेऊनही कामे अपूर्ण राहिल्याने मनपाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पर्यायी व्यवस्था न करता घेतलेल्या निर्णयाचा फटका नागरिकांना बसत असून, पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Nashik Bribe Crime : नाशिक झेडपीत लाचखोरीचा ‘व्हायरस’; ठाकरेंनंतर पेसांतर्गत शिक्षण विभागाचा बहाद्दर ‘एसीबी’च्या जाळ्यात
मंदिरातून पाणी शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक पातळीवर पुढाकार घेत मंदिरातून पाणीपुरवठा करण्यात आला. नगरसेविका अदिती ऋतुराज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजेबहाद्दर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश कुसमोडे, ऋतुराज पांडे व संदेश फुले यांच्या सौजन्याने ही व्यवस्था करण्यात आली. परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होत असल्याने मंदिर परिसरातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून स्थानिकांनी याचे स्वागत केले आहे.
महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल.
रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता




