नाशिक | Nashik
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात (Nashik-Trimbakeshwar Area) सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, या कामांमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच भाविक, पर्यटक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण संमारंभाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ व गोदाघाट तसेच नाशिक येथील द्वारका सर्कल तसेच ओझर विमानतळ येथे भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि भविष्यातील नियोजनाची माहिती घेतली. यावेळी कामांची गती वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या – CM फडणवीस
यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव तथा पालक सचिव एकनाथ डवले, आमदार हिरामण खोसकर , विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. एस. व्ही. स्वामी, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, एमएसआयडीसीचे अधिकारी ब्रिजेश दीक्षित उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुढील २५ ते ३० वर्षांचा विकासाचा पाया
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू असलेली कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून, पुढील २५ ते ३० वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया मजबूत करणारी आहेत. आधुनिक शहराच्या दिशेने वाटचाल करताना वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, भाविक व पर्यटकांसाठी सुविधा तसेच नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने ही कामे परिवर्तनात्मक ठरणार आहेत. पुढील टप्प्यात विमानतळाशी संबंधित विकासकामांनाही गती मिळणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभाग आणि यंत्रणा समन्वयाने काम करीत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
सर्व यंत्रणांच्या समन्वयातून विकास
महानगरपालिका, एमएसआरडीसी, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच विविध संबंधित विभागांच्या समन्वयातून ही कामे सुरू आहेत. पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा समन्वय तसेच सर्व यंत्रणांची एकत्रित टीम म्हणून सुरू असलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. या विकासकामांना गती देणाऱ्या सर्व यंत्रणांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. विशेषतः एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण कामांचे त्यांनी कौतुक केले.
हे देखील वाचा : Nashik News : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात नाशिकचा डंका; जिल्हा परिषद, नाशिक पंचायत समिती राज्यात प्रथम
त्र्यंबकेश्वरच्या विकासाला नवी दिशा
त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ व गोदाघाट परिसरातील कामे आव्हानात्मक असली तरी ती नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, परिसराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वरचे महत्त्व अधिक व्यापक करण्यासाठीही या कामांचा उपयोग होणार आहे.
द्वारका सर्कल व विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही पाहणी
नाशिक येथील द्वारका सर्कलचे काम अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक आहे. मात्र, हे काम नियोजनबद्ध पद्धतीने वेगाने सुरू असून निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी निचऱ्याची चाचणी करण्यात आली असून, पावसाचे पाणी साचणार नाही आणि निचरा सुरळीत होईल, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर त्यांनी ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळानिमित्त नाशिकला येणारे भाविक व पर्यटक यांना आवश्यक व पायाभूत सेवा-सुविधांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आमदार प्रा देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, एमएसआयडीसीचे अधिकारी ब्रिजेश दीक्षित, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




