नाशिक | Nashik
‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘हरित कुंभ – हरित मान्सून’ अर्थात ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात आज नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते यावेळी वृक्ष (Tree) लागवड करण्यात आले. सामाजिक, धार्मिक, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि हजारो पर्यावरणप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी पिंपळगाव बहुला येथे महादेव मंदिर परिसरात नंदिनी नदीच्या काठावर तर त्यानंतर येथील भाभा नगर परिसरात नोंदणी नदीच्या काठावर वृक्ष रोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित नाशिक घडविण्याचा आपण सर्वांनी संकल्प केला आहे. हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून प्रत्येक नाशिककराचा संकल्प आहे. नागरिकांनी घेतलेल्या या निर्धारामुळे येणाऱ्या काळात नाशिकचा चेहरामोहरा निश्चितच बदललेला दिसेल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला देशातील आदर्श, पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध शहर म्हणून विकसित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Eknath Khadse : अमित शाहांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली, पण…; एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
ते पुढे म्हणाले, “देशात (Country) सर्वाधिक वृक्ष असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण करणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक ध्येय आहे. यासाठी शासनासोबत सर्व समाजघटक, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना, उद्योग क्षेत्र आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेत या अभियानात मोलाचे योगदान दिले असून त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आजपर्यंत ‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत वृक्षलागवडीसाठी नाशिककरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा पर्यावरणाविषयीची त्यांची बांधिलकी अधोरेखित करणारा आहे”, असे त्यांनी सांगितले.
‘मिशन ग्रीन मान्सून’ (Mission Green Monsoon) अंतर्गत यापूर्वी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबवून नदीपात्र स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरणाची महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली. आता त्या नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून नंदिनी नदीला कायमस्वरूपी हरित संरक्षण कवच देण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात येत आहे. या अभियानात विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, युवक, महिला, विद्यार्थी, स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या नाणीज पीठाचे अनुयायी तसेच विविध सेवाभावी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षारोपण केले. वृक्षलागवडीसोबतच त्यांचे संवर्धन करण्याचाही संकल्प यावेळी करण्यात आला.
हे देखील वाचा : Girish Mahajan : “त्यांची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन, माझी मुंबईपर्यंतही नाही”; गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला
यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सभापती समाधान देवरे, नगरसेवक विश्वास नांगरे, गटनेते श्याम बडोदे, इंदुमती नागरे, माधुरी बोरकर, सचिन मराठे, संध्या कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, मंगला ननावरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, अजिंक्य साने, रूपाली निकुळे महामंत्री जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणिजधाम, निसर्गप्रेमी शेखर गायकवाड, चंद्रकिशोर पाटील, मनोज साठे, राजेश पंडित, जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे हजारो भक्त, विविध राजकीय पदाधिकारी आणि नाशिककर उपस्थित होते. यांच्यासह विविध सामाजिक व पर्यावरणीय संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रमांची सुरुवात
‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रमांचीही आज सुरुवात करण्यात आली. सातपूर विभाग सभापती समाधान देवरे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या ‘ निर्माल्य संकलन रथ’ आणि ‘गोमाता दान सेवा रथ ‘ या उपक्रमांचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, धार्मिक निर्माल्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन आणि गोसेवेला चालना देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम सुरू करण्यात आले असून, सामाजिक सहभागातून पर्यावरणपूरक उपक्रमांना गती देण्याचा प्रयत्न यामागे आहे. या उपक्रमांमुळे ‘उन्नत नाशिक अभियान’ अधिक व्यापक होत असून, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा प्रभावी संगम साधला जाणार असल्याचे मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.यावेळी सातपूर परिसरातील पिंपळगाव बहुला येथे नंदिनी नदीचे जलपूजन हे मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.




