
नाशिक | Nashik
शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे (Nashik Potholes) नाशिककरांना (Nashik) मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे (Potholes) आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक झाले असून, येत्या ७ ऑगस्ट रोजी नाशिककर नागरिकांच्या वतीने काढण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान या खड्ड्यांच्या प्रश्नांवरून राज्यात एकत्र सत्ता भोगत असणार्या महायुतीमध्ये (Mahayuti) देखील चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्यांवर उतरून पाहणी करावी असे म्हटले होते. त्यावर महाजन यांनी देखील पालकमंत्री (Minister) असो वा नसो, मी नाशिकमध्ये नेहमी हजर असतो. येत्या सहा महिन्यांत नाशिकचा चेहरामोहरा बदलेल आणि सर्व कामे पूर्ण होतील, असे म्हटले होते.
दुसरीकडे या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने “दत्तक नाशिकचे पालक देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा,ही सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावना आहे,” असे फलक शहरातील विविध ठिकाणी लावले होते. त्यावरून महायुतीमध्ये वादाचा भडका उडाला होता. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हे फलक काढण्याचे आदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांना दिले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.
हे देखील वाचा : Nashik Potholes News : नाशिक खड्डेमुक्तीसाठी भुजबळांना पालकमंत्री करा; दत्तक पालक फडणवीसांकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
यावेळी ते म्हणाले की,”नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची समस्या निर्माण झाली असून, खड्डयांमुळे पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिकबद्दल बरचं काही बोलले जात आहे. याचा अर्थ छगन भुजबळ यांना पालकमंत्री (Guardian Minister) करा असा होत नाही. हे काम ज्यांच्याकडून सुरु आहे त्यांच्याकडून व्यवस्थित करा असं माझे म्हणणे आहे. मला पालकमंत्री करा असे फलक ज्यांनी लावले त्यांच्यापर्यंत मी माझी नाराजी पोहोचवली असून,ते फलक काढायला सांगितले, असे भुजबळ यांनी म्हटले.
कुंभमेळा प्राधिकरणाने लक्ष द्यावे
नाशिक शहरात आणि जिल्ह्यात अनेक गंभीर समस्या आहेत. रस्त्यांची दुरवस्था सातत्याने समोर येत आहे. मी स्वतः यासंदर्भात आवाज उठवला आहे. आता कुंभमेळा प्राधिकरण प्रमुख नियुक्ती झालेली आहे, त्यामुळे त्यांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.पावसाळ्यात खड्डे तात्काळ भरले पाहिजेत जेणेकरून अपघात टळतील. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.
हे देखील वाचा : Nashik News : खड्ड्यांवरून मंत्र्यांमध्ये जुंपली; भुजबळांच्या ‘त्या’ टीकेला महाजनांचे जशास तसं उत्तर, म्हणाले “मी नाशिकमध्ये नेहमी…”
मला त्यावर बोलायचे नाही
पुढे भुजबळ यांना जिल्ह्यात पाच ते सहा मंत्री असूनही नाशिककडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. पण सर्व संबंधित अधिकारी आणि कारभारी यांनी अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नक्कीच आहे,असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच कुंभमेळा नियोजनाबाबत बोलताना सांगितले की, “कुंभमेळ्यावर कोणतीही नाराजी नाही. मात्र, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन मतदारसंघातील अडचणी सोडवल्या पाहिजेत”, अशी ठाम भूमिका असल्याचे भुजबळ म्हणाले.




