नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी चार दिवस जिल्ह्यात पावसाळी (Rain) वातावरण राहण्याची शक्यता असून, विशेषतः मंगळवारी (दि. ३१) जिल्ह्यासह (District) घाट प्रक्षेत्रात ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) देण्यात आला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत इगतपुरी (Igatpuri) येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने नाशिक जिल्ह्यासाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. ३० मार्च, ०१ व ०२ एप्रिल या तीन दिवसांत यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
या काळात जिल्ह्यात तसेच घाट माथ्यावर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. गुरुवारी (दि.३१) ऑरेंज अलर्ट या दिवशी हवामान (IMD) अधिक खराब होण्याची शक्यता असून, ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहून मोठ्या प्रमाणावर गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Crime News : सरकारी सल्लागाराची गुंडगिरी; माफियांच्या बचावासाठी थेट ज्येष्ठास एनकाउंटरची धमकी
शेती व पिकांवर होणारा परिणाम
कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाजानुसार , हा अवकाळी पाऊस आणि गारपीट पिकांसाठी घातक ठरू शकते. विशेषतः काढणीला आलेली पिके आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
शेतकऱ्यांना व नागरिकांना आवाहन
काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. विजा कडाडत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे. घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून स्वतःचा बचाव करावा, असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा, इगतपुरी यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : टोकडे येथे टोळक्याकडून दगड, धारदार शस्त्रांनी हल्ला; ८ ते १० जण जखमी
राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
३० मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. ३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत.
सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.
हे देखील वाचा : Nashik News : पाइप अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू





