नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) रिंगणात महायुतीमध्येच (Mahayuti) बंडखोरीचे चित्र निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत जवळ आली असताना, ही बंडखोरी शमणार की कायम राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बंडखोरी रोखण्यासाठी मुंबईत (Mumbai) पक्षपातळीवर जोरदार लॉबिंग सुरू आहे.
महायुतीमध्ये पेच, महाविकाचा ‘बाय’
या निवडणुकीची जागा शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला आली असून, त्यांनी नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते (Ganesh Gite) आणि प्रसाद हिरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ‘एबी फॉर्म’ न मिळाल्याने त्यांचे अर्ज अपक्ष म्हणून कायम आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गोरख बोडके आणि विष्णुपंत म्हैसधुने यांचेही अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरले आहेत. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीने या निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे गट) ‘बाय’ दिला असल्याने आघाडीचा कोणताही उमेदवार (Candidate) अधिकृत रिंगणात नाही. यामुळे आता मविआचे तिन्ही पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
हे देखील वाचा : Sanjay Raut : “शिंदे गट पहिला क्रमांकाचा शत्रू, आमच्याकडील मते…”; राऊतांचे नाशिकमध्ये विधानपरिषदेच्या मतदानाबाबत मोठे वक्तव्य
‘बिनविरोध’साठी मुंबईत बैठकांचा जोर
निवडणुकीत महायुतीमधीलच अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांचे आव्हान मोठे आहे. त्यांना रिंगणातून बाहेर काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गणेश गिते आणि गोकुळ गिते हे पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करून माघार घेतात की, निवडणुकीत कायम राहतात, यावरच ही निवडणूक बिनविरोध होणार की ‘दराडे विरुद्ध गिते’ अशी चुरस होणार, हे अवलंबून आहे.
भुजबळ-कांदे फॅक्टर महत्वाचा
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांची भूमिका महायुतीच्या उमेदवाराच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ते महायुतीचा धर्म पाळणार की, काय भूमिका घेतात? यावरच महायुतीचे सर्व गणित अवलंबुन आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parisahd Election : युतीच्या घटकपक्षांमध्ये नाराजी; दराडेंचा अर्ज भरण्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांची पाठ तर कांदे गैरहजर
पक्ष आदेशाची प्रतीक्षा
अपक्ष अर्ज असलेल्या राजकीय पक्षाच्या काही उमेदवारांनी निवडणूक रिंगणात रहायचे की, माघार घ्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून असून त्यानुसार आपण निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
डिपॉझिटची चिंता
राजकीय वर्तुळात आता निवडणुकीच्या निकालापेक्षा उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांना आपलया ‘डिपॉझिट’ची चिंता लागल्याची चर्चा रंगली आहे.अर्ज मागे घेतला तर डिपॉझिट मिळेल का? अशी विचारणा एकमेकांना करू लागले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parisahd Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी नऊ जणांचे तब्बल ‘इतके’ अर्ज दाखल; छाननीत कुणाचे अर्ज बाद होणार?
मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाशिकच्या या पेचावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर समजूत काढण्यात यश आले नाही, तर नरेंद्र दराडे आणि गोकुळ गिते यांच्यात काट्याची लढत होण्याची दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.




