नाशिक | Nashik
राज्यातील विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) १७ पैकी ६ जागा बिनविरोध जिंकत महायुतीने (Mahayuti) धडाकेबाज सुरुवात केली आहे. कोकणात अनिकेत तटकरे तर पुण्यात विक्रम काकडेंची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जागावाटपात ही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shivsena) सुटली असतानाही, भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : आमदार किशोर दराडेंनी घेतली गणेश गितेंची भेट; बंद दाराआड खलबतं, नेमकं काय ठरलं?
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी गणेश गिते (Ganesh Gite) यांची आज (मंगळवारी) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड साधारण तासाभरापेक्षा अधिक काळ खलबतं झाली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना किशोर दराडे यांनी “गणेश गिते यांच्या पत्नी दिपाली गिते या नगरसेविका असल्याने आमच्या मतदार आहेत. मी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी त्यांच्याकडे मत मागण्यासाठी आलो होतो. यावेळी त्यांनी मला त्या युतीचा धर्म पाळणार असून महायुतीसोबतच राहतील”, असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याचे म्हटले.
तसेच गोकुळ गिते (Gokul Gite) हे माझे छोटे भाऊ असून, मी त्यांचीही भेट घेणार आहे. त्यांना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मदत करावी, अशी विनंती करणार आहे. शेवटी पाठिंबा देण्याचा निर्णय ते स्वतः घेतील”, असे किशोर दराडे म्हणाले. दरम्यान नाशिक मतदारसंघात महायुतीकडे ६२३ पैकी तब्बल ४६८ मतदारांचे भक्कम बहुमत आहे. कागदावर एवढे एकतर्फी संख्याबळ असतानाही महायुतीच्या बड्या नेत्यांना आपल्याच मतदारांवर विश्वास नाही का? एका अपक्ष उमेदवाराची एवढी धास्ती का घेतली जात आहे? असे अनेक टोकदार सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : महायुतीतील बंडखोरीवर आज अंतिम फैसला; गोकुळ गिते मुंबईत, मंत्री महाजनांची मध्यस्थी यशस्वी होणार का?
गिते बंधुंमुळे ‘संकटमोचक’ संकटात
उमेदवारी अर्ज दाखल केलेले गोकुळ गिते आणि त्यांचे बंधू गणेश गिते हे मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे आणि अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ते मानले जातात. त्यामुळे महायुतीच्या गोटात आता वेगळीच कुजबूज सुरू झाली आहे. गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरूनच तर गितेंनी हा बंडखोरीचा अर्ज भरला तर नाही ना? अशी दाट शंका शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक नेत्यांकडून उपस्थित केली जात आहे. एकीकडे गिते माघार घेण्यास तयार नाहीत आणि दुसरीकडे ते महाजनांचेच खंदे समर्थक असल्याने या वादात आता भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजनच (Girish Mahajan) संकटात सापडले आहेत.
शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर
गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी काल-परवापर्यंत शिवसेना आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकत्र येऊन बैठका घेत होते. यात हिरे यांनी माघार घेत नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर गोकुळ गिते अजूनही उमेदवारीवर ठाम आहेत. ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली असताना भाजप नेत्याचा भाऊ मागे हटत नसल्याने शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे समजते.




