मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरेंच्या पक्षातील खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात ठाकरेंच्या पक्षातील ९ पैकी ८ खासदार बुधवारी एकनाथ शिंदेंसोबत बैठकीला उपस्थित होते असा दावा केला आहे. या बैठकीमुळे शिवसेना (ठाकरे गट)मध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही नेत्यांसह खासदार अरविंद सावंत यांचेही नाव घेण्यात आले आहे, यावरून अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला ठाकरे गटातील ६ खासदार प्रत्यक्ष तर २ खासदार व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे उपस्थित होते असे म्हंटले जात आहे. त्यात खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बैठकील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिकांपैकी एक समजले जातात. पण, पहिल्यांदाच अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंना सोडणार असल्याचे वृत्त आल्यानंतर त्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. तसेच, ठाकरेंना सोडणार नाही, हे सावंत यांनी पत्र लिहून दिले आहे.
अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले?
अरविंद सावंत म्हणाले, “मी थोडे रागात असून कीवही येत आहे. मिंदेंसोबत मी जाणार असल्याचं वृत्त एका वर्तमानत्राने झापलं. कालपर्यंत बाकीच्यांची नावे दिली जात होती. आज माझेही दिलंय. नशिब अनिल देसाईंना वगळण्यात आलं आहे. मला कुणाचाही फोन आला असेल तर देईल ती शिक्षा भोगायला तयार आहे.”
एका फोन कॉलवर मंत्रिपदाचा राजीनामा दिला
उद्धव सेनेतून शिंदे सेनेत कोण कोण जाणार त्या 8 जणांमध्ये माझा पण फोटो आहे. कालपर्यंत माझ्या सहकाऱ्यांची नावं देत होती. आज माझाही फोटो दिला. आमचं नशीब आहे की, अनिल देसाई यांचं नाव वगळलं आहे. या बातमीचा कडाडून निषेध करतो. देशातील जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. एका जरी ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कॉल आला असेल अथवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन. एक लक्षात ठेवा मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे हे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात, त्या पक्षाचा मी शिवसैनिक आहे. मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या एका फोन कॉलवर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केलं. तर उद्धव ठाकरे यांनी मला खासदार केलं आहे. गद्दारांच्या बाबतीत काय विचार आहे हे समजून घ्या अगोदर, असंही अरविंद शिंदेंनी म्हटलं आहे.
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी त्यांची डेडबॉडी करुन टाकली, ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
आम्ही विकली जाणारी औलाद नाही
येत्या 24 तारखेला पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे यावर अंतिम सुनावणी आहे. मग अशा बातम्या सोडायच्या. कोर्टासमोर त्या मांडायच्या. विकली जाणारी आणि विकत घेणारी माणसं कोण हे तुम्ही ओळखा. पन्नास खोके एकदम ओके हे कोण म्हणालं होतं? कबुल केले ना त्यांनी जाहीर सभेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी कबूल केले ना, जाहीर केलं ना. आम्ही विकली जाणारी औलाद नाही, अशी तिखट प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.
पत्रात काय लिहिलं?
“मी, अरविंद गणपत सावंत, शिवसेना नेता, खासदार, मुख्य नेता, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना, आज जाहीरपणे लिहून देत आहे की, मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरेसाहेब ) यांचा निष्ठावंत शिवसैनिक असून, मला उभा चिरला जरी शिनसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, ‘मातोश्री’शी असलेले नाते कधीही तोडणार नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, खरं तर मूळ शिवसेना पक्ष यांच्यासोबत प्रतारणा करणे म्हणजे ‘आईच्या दूधाशी’ प्रतारणा करणे आहे असे मी समजतो…..या वर्तमानपत्राने मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून मी दुसऱ्या पक्षात जात आहे अशी खोटी बातमी छापली. त्याचा मी तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालांट लावले म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात करणार आहे,” असा मजकूर सावंतांनी पत्रात लिहिला आहे.




