नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लैंगिक अत्याचार आणि भोंदूगिरीने नाशिक हादरवून सोडणाऱ्या अशोककुमार खरात (Ashok Kharat) उर्फ ‘कॅप्टन’ प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी चक्क राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीच हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या ड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. यामुळे या रॅकेटची पाळेमुळे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर सुषमा अंधारे यांनीही एसआयटी प्रमुखांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT ने तेच केले सील; लिंगपिसाट खरातला दणका
रुपाली ठोंबरे-पाटील यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये (Nashik) गंभीर आरोप केले. जेव्हा पीडित महिला मदतीसाठी महिला आयोगाकडे जात होत्या, तेव्हा त्यांना दिलासा देण्याऐवजी ‘तुमचे ग्रह-तारे ठीक नाहीत, नाशिकच्या खरात बाबाकडे जाऊन विधी करा’ असा सल्ला दिला जात होता, असा दावा ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणातील व्हायरल व्हिडिओ (Video) आणि समोर आलेले पुरावे पाहता, सूत्रधार चाकणकर असाव्यात, असा थेट संशय त्यांनी व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर, या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला असून, या गुन्ह्याची व्याप्ती आता केवळ अत्याचारापुरती मर्यादित राहिलेली नाही.
एसआयटीकडून ‘स्पॉट पंचनामा’
दुसरीकडे, विशेष तपास पथकाने शुक्रवारी खरातला सोबत घेऊन कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टी’ कार्यालयात दोन पीडितांसह ‘स्पॉट पंचनामा’ केला. या कार्यालयातच खरात महिलांवर अत्याचार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत एसआयटीने घटनाक्रम पुन्हा एकदा पडताळून पाहत महत्त्वपूर्ण तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. खरातच्या विदेश दौऱ्यांमागेही केवळ भोंदूगिरी असून, त्याने एका कुटुंबाला पूजेच्या नावाखाली चक्क परदेशात नेल्याचे उघड झाले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : पाप झाकण्यासाठी खरातचा नीच डाव! पीडितेची ढाल करत ऑफिसबॉयला बनवले ‘बळीचा बकरा’
मी अंतर्मनाचे ऐकले नाही… खरातचा दावा
तपासादरम्यान खरातने पोलिसांसमोर अत्यंत विचित्र दावे केले आहेत. हे सर्व एका पूजा विधीचा भाग होता, मी स्वतःहून कोणत्याही महिलेकडे गेलो नाही, असे त्याने म्हटले आहे. मात्र, एसआयटीला त्याच्यावर नरबळी किंवा खुनाचाही संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान, खरातची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याचा एचआयव्ही अहवाल नकारात्मक आला आहे.




