नाशिक | Nashik
पुण्यातील (Pune) उच्चभ्रू वस्ती असलेल्या गाव पार्क येथील एका संशयास्पद जमीन व्यवहाराने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नाशिकमधील कथित ‘बलात्कारी बाबा’ अशोक खरात याने लोकांची फसवणूक (Fraud) करून कमावलेला कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा, त्याचे सहकारी आणि पुण्याचे सीए ललित प्रकाश पोफळे यांच्या माध्यमातून पांढरा केल्याचा गंभीर आरोप सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी केला आहे. याप्रकरणी कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ‘एसआयटी’ चौकशीची मागणी केली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू खरात प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत; महिला IAS अधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर
विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी पुराव्यासह सादर केलेल्या दाव्यानुसार, कोरेगाव पार्क येथील सिटी सर्व्हे नं. ५७ मधील ५० गुंठे जमिनीचा व्यवहार अत्यंत संशयास्पद आहे. ही जमीन मूळची एका सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची (आर. एफ. मुल्ला ट्रस्ट) असतानाही, धर्मादाय आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता तिचा व्यवहार करण्यात आला. या जमिनीचे बाजारमूल्य साधारण १०० कोटी रुपये असताना कागदोपत्री केवळ १९.५६ कोटी रुपये किंमत दाखवून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातने मिरगावचा विकास निधी ईशान्येश्वर मंदिराकडे कसा वळवला? नगराध्यक्ष, नगरसेवकांनी केला भांडाफोड
सामान्यतः जमिनीसाठी (Land) सेल डीड केले जाते, मात्र येथे स्टॅम्प ड्युटी बाचवण्यासाठी आणि मालकी हक्क लपवण्यासाठी असाइनमेंट /कन्फर्मेशन डीडचा आधार घेण्यात आल्याचे कुंभार यांनी सांगितले असून अशोक खरात याने अनैतिक मार्गाने कमावलेला पैसा पोफळे कुटुंबियांच्या माध्यमातून या जमिनीत गुंतवला आहे. बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचा दावा करण्यात आला आहे. १९८७ मधील कथित व्यवहार तब्बल ३५-४० वर्षांनंतर कन्फर्म करण्यात आला, व्यवहारात पॉवर ऑफ अॅटनींचा उल्लेख आहे; परंतु ती नोंदणीकृत प्रत कागदपत्रांना जोडलेली नाही.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जीवाला धोका; SIT चे न्यायालयाला पत्र, आजच्या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं?
कठोर कारवाईची मागणी
विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, या प्रकरणाची उखद, प्रवर्तन संचालनालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत संयुक्त चौकशी व्हावी. तसेच, संबंधित अधिकारी आणि ललित पोफळे यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या प्रकरणामुळे आता रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘काळा पैसा’ आणि गुन्हेगारी जगताचे संबंध पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातचा पाय खोलात; दुसऱ्या गुन्ह्यात बेड्या, आज कोर्टात हजर करणार




