नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर, नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांनी मंगळवारी (दि.२३) आमदारकीची शपथ (MLA Oath) घेतली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी गिते यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी गोकुळ गिते कुटुंबासह आणि समर्थकांसह विधानभवनात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत मातोश्री सुनीता गिते, पत्नी उज्ज्वला गिते, काका दिगंबर गिते, बंधू गणेश गिते, भाजपच्या नगरसेविका दीपाली गिते यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी
यांनतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीही भेट घेतली. यावेळी आमदार सुहास कांदे त्यांच्या समवेत होते. विधानभवनात एन्ट्री करताच आमदार गोकुळ गिते यांची पहिली भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्याशी झाली. या दोन्ही नेत्यांनी अत्यंत उत्साहात एकमेकांची गळाभेट घेतली आणि एकत्र फोटोही काढले, राजकीयदृष्ट्या या दोन्ही नेत्यांच्या गळाभेटीची आणि केमिस्ट्रीची विधानभवन परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चर्चेची ठरली होती. वास्तविक, गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी पक्षाने महाजन यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. महाजन आणि गिते बंधूंचे कौटुंबिक संबंध असल्याने, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीनंतर गिते यांनी निवडणूक प्रचार थांबवत आहोत’ अशी घोषणाही केली होती.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : “माझा विश्वासघात…”; पराभवानंतर नरेंद्र दराडेंची संतप्त प्रतिक्रिया
प्रत्यक्षात त्यांनी ‘गनिमी कावा’ करत ही निवडणूक लढवली आणि थेट विजय खेचून आणला. आता या विजयानंतर पराभूत आमदार नरेंद्र दराडे यांनी थेट आरोप केला आहे की, गितेंच्या या विजयामागे महाजन यांचीच पडद्यामागची खेळी होती आणि त्यांनीच गितेंना छुपी ताकद दिली. दरम्यान, शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपले अभिनंदन केल्याची माहिती आमदार गोकुळ गिते यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
‘जय गिरीश महाजन’ घोषणेने पिकला हशा!
शपथविधी पूर्ण झाल्यानंतर गोकुळ गिते यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र जय शिवराय’ अशी घोषणा दिली. मात्र, त्याच वेळी प्रेक्षक गॅलरी किंवा सभागृहातून अचानक ‘जय गिरीश महाजन…’ अशी घोषणा देण्यात आली. या अनपेक्षित घोषणेमुळे संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गितेंना उद्देशून हसत म्हणाले, अनऑफिशियल काही केलं असेल तर सांगून द्या, आता काही राहिलं नाही… मुख्यमंत्र्यांच्या या डायलॉगवर सभागृहात पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला.
हे देखील वाचा : MLA Gokul Gite : काँग्रेसमधून राजकारणास सरुवात ते आमदारकीपर्यंत मजल; महायुतीच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारणारे गोकुळ गिते नेमके कोण?




