Sunday, June 14, 2026
HomeनाशिकChhagan Bhujbal : 'साहेब निर्णय घ्या', येवल्यात झळकले फलक; भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष

Chhagan Bhujbal : ‘साहेब निर्णय घ्या’, येवल्यात झळकले फलक; भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक | Nashik

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांचा पत्ता कट करत पक्षाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातील माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे भुजबळ यांचे दिल्लीत जाण्याचे स्वप्न भंगले असून, त्यांचे समर्थक देखील नाराज झाले आहेत. याबाबतचा रोष त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फलक लावून व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “मी कबड्डीचा खेळाडू…, इतरांसारखा न्याय मलाही मिळावा”; मंत्री भुजबळ नाराजीबाबत रोखठोक बोलले

छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीने (NCP) राज्यसभेची उमेदवारी न दिल्यामुळे त्यांच्या येवला मतदारसंघात (Yeola Constituency) समर्थकांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून आपला जाहीर निषेध आणि नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टर्सवर ‘साहेब निर्णय घ्या’ असा थेट आणि मोठा मजकूर लिहिण्यात आला आहे. शेवटच्या क्षणी पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी आता भुजबळांना पुढील राजकीय पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता भुजबळ कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : गिते बंधुंमुळे ‘संकटमोचक’ संकटात; शिंदे सेनेत नाराजीचा सूर

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण राज्यसभेवर गेल्यावर त्याजागी पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देऊन त्यांना आपल्याकडे असलेले मंत्रिपद द्यावे, अशी अट घातली होती. याकरिता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी (CM) त्यांना हायकमांडशी चर्चा करून कळविणार असल्याचे सांगितले होते. पंरतु, भाजपच्या दिल्लीतील (Delhi) हायकमांडने राज्य मंत्रिमंडळाचा सध्या विस्तार करण्यास नकार दिल्याने भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली.यानंतर राष्ट्रवादीने रविवारी राज्यसभेच्या (Rajyasabha) जागेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर मंत्री भुजबळ यांनी सोमवारी माध्यमांशी बोलतांना स्पष्टीकरण देखील दिले होते.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : आमदार किशोर दराडेंनी घेतली गणेश गितेंची भेट; बंद दाराआड खलबतं, नेमकं काय ठरलं?

भुजबळ काय म्हणाले होते?

माध्यमांशी बोलतांना छगन भुजबळ यांनी सांगितले होते की, “मला राज्यसभा आणि लोकसभेवर जायचे होते. चार ते पाच वेळा संधी आली पण दुर्देवाने ती मिळाली नाही. यावेळी देखील जायचे होते पण ती देखील संधी मिळाली नाही. राष्ट्रवादीचे मकरंद पाटील मंत्री आहेत. त्यांचे भाऊ खासदार आहे. सुनेत्रा पवार मंत्री, पुत्र खासदार, तटकरे खासदार पुत्र आमदार त्यामुळे मलाही हाच नियम लागू करावा, अशी विनंती केली. त्यावर संवाद साधण्यासाठी वेळ लागला असावा. भाजपकडे हा विषय गेला तेव्हा ज्यावेळी मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार होईल तेव्हा विचार करू असे सांगण्यात आले. त्यामुळे भाजपने नकार दिला यात तथ्य नाही. मी नाराज नसून, इतरांना जो न्याय दिला तोच मला लावावा असे म्हटले होते. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असे मला वाटत नाही. आज नही तर कल, कल नही तो आगे, मी कबड्डीचा खेळाडू असून बुद्धीबळाचा नाही. मला बुद्धीबळ जमत नाही”, असे म्हणत त्यांनी
नाराजीच्या विषयावर भाष्य केले होते.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : महायुतीतील बंडखोरीवर आज अंतिम फैसला; गोकुळ गिते मुंबईत, मंत्री महाजनांची मध्यस्थी यशस्वी होणार का?

भुजबळांच्या पुढील भूमिकेकडे राज्याचे लक्ष

येवला मतदारसंघात लागलेल्या या पोस्टर्सची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. समर्थकांच्या या जाहीर भूमिकेनंतर आता छगन भुजबळ स्वतः काय निर्णय घेतात, पक्षाच्या या निर्णयावर त्यांची काय प्रतिक्रिया येते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही नाराजी आगामी काळात काय वळण घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...