मुंबई | Mumbai
महिला भक्तांचे लैंगिक शोषण व कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला (Ashok Kharat) पोलिसांनी (Police) अटक केली आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटी आणि ईडीकडून (SIT and ED) चौकशी केली जात आहे. काल (सोमवारी) त्याच्या घरावर आणि कार्यालयात ईडीने छापेमारी केली. यात खरातच्या कर्मयोगी नगरातील ‘तृप्तबाला’ निवासस्थान येथे कौटुंबिक चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तर मुख्य कार्यालय असलेल्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीज येथेही तपासणी केली.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरात-पोफळेचे सोलापूर कनेक्शन; अकरा एकर जमिनीचा खरेदी दस्त उघड, पत्नीच्या नावे कोट्यवधींची माया?
तसेच एका पतसंस्थेत आर्थिक व्यवहारांची आणि ठेवींची तपासणी केली. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. दरम्यान, अशोक खरातसोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आता तब्बल २८ दिवसानंतर रुपाली चाकणकर यांनी खरातप्रकरणी होत असलेल्या आरोपांवर सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.
दरम्यान, बीडमधील (Beed) एका महिला पदाधिकाऱ्याद्वारे स्थानिक महिलांना अशोक खरातकडे पाठवले जात होते आणि हे सर्व कथितपणे रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने घडत होते असे एक पत्र बीडमधून राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे यांना मिळाले होते. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती. याच प्रकरणावर आता रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या कार्यक्रमाला IG कराळेंची उपस्थिती; अंजली दमानियांनी फोटो, Video शेअर करत केला गंभीर आरोप
रुपाली चाकणकरांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे.याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले.
तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : पोते भरून आलेले पैसे कुठे जिरले? खरातकडे मोठ्या प्रमाणावर ‘अपसंपदा’ असल्याचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती
यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे.




