नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तंत्र-मंत्र आणि भविष्याच्या नावाखाली महिलांचे शाषण करणारा भोंदू अशोककुमार एकनाथ खरात (Ashok Kharat) उर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दररोज वाढत आहे. आतापर्यंत खरातविरुद्ध १२ गंभीर गुन्हे दाखल झाले असून, त्यात ८ लैंगिक अत्याचार, सावकारी, खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन विशेष तपास पथकाने (एसआयटी) धारण केलेले कमालीचे ‘मौनव्रत’ आता चर्चेचा विषय ठरत आहे. तपासात नेमके काय निष्पन्न झाले, याची कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने खरात प्रकरणाला (Kharat Case) नेमकी कोणती दिशा दिली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!
विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा (Manoj Kumar Sharma) यांच्या आदेशान्वये १३ मार्च रोजी ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली. १९ मार्चपासून हे पथक नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत ठाण मांडून आहे. अनेक हायप्रोफाईल व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे, परंतु एसआयटी प्रमुखांनी अद्याप एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. न्यायालयात संशयिताला हजर करताना उपस्थित राहणारे उपअधीक्षकही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने, एसआयटी नेमकी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी शंका पीडितांकडून आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तगादा लावू नकोस, अन्यथा देवाचा कोप होईल; खरातने कांदा व्यापार्यालाही धमकावले
धक्कादायक म्हणजे, खरातविरुद्ध दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती नाशिक शहर पोलिसांना देण्यासही मज्जाव करण्यात आल्याची कुजबूज पोलीस वर्तुळात आहे. एकीकडे अहिल्यानगरचे शिर्डी पोलीस या प्रकरणातील तपासाचा आणि अटकेचा अहवाल नियमितपणे स्पष्ट करत आहेत, तर दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. एसआयटीच्या या भूमिकेमुळे शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे, असे समजते.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सातपूरला ‘खरात फाईल्स’ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला बेड्या
आदेश धाब्यावर?
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भोंदूगिरी आणि शोषणाच्या या गंभीर प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गृहमंत्र्यांचे इतके स्पष्ट निर्देश असतानाही एसआयटीने तपासाभोवती ‘गुढ’ वलय निर्माण केले आहे, ते अनाकलनीय आहे. तपासातील ही गोपनीयता गुन्हेगाराला मदत करण्यासाठी आहे की मोठ्या धेंडांना वाचवण्यासाठी ? असा सवाल विचारला जात आहे. एसआयटीचे हे मौन पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी प्रकरणातील गांभीर्य कमी करणारे ठरू शकते.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : खरातच्या मालमत्तेची ईडी चौकशी होणार – मुख्यमंत्री फडणवीस




