नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लैंगिक अत्याचार आणि भोंदूगिरीत पकडलेल्या अशोककुमार खरात (Ashok Kharat) उर्फ ‘कॅप्टन’चा तपास करताना विशेष तपास पथकाची (एसआयटी) गाडी केवळ चौकशीच्या रुळावरच अडकल्याचे दिसत आहे. तब्बल १८ दिवसांपासून बारा गंभीर गुन्ह्यांचा तपास सुरू असताना खरातव्यतिरिक्त एकाही मोठ्या माशाला ‘एसआयटी’ने गळाला लावलेले नाही. खरातची पत्नी गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असतानाच, आता पोलिसांनी (Police) ताकीद देऊन सोडलेला त्याचा मुलगा हर्षवर्धन हा देखील पसार झाल्याने तपासातील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!
महिलांचे शोषण करणाऱ्या खरातवर बलात्काराचे आठ, सावकारी, खंडणी आणि फसवणुकीचे (Fraud) अन्य चार गुन्हे दाखल आहेत. सिन्नरच्या एका व्यावसायिकाला कोटींचा गंडा घालून त्या पैशातून मुलीच्या नावे भूखंड खरेदी केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंद असला, तरी ‘एसआयटी’ ने तपासातील प्रगतीबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. शिर्डी पोलिसांनी या टोळीतील साथीदारांना बेड्या ठोकल्या असल्या, तरी नाशिकमध्ये (Nashik) मात्र केवळ चौकशीचा फार्स सुरू असल्याची चर्चा आहे. खरातच्या पत्नीविरुद्ध ‘लुक आऊट’ नोटीस बजावण्यात आली आहे, मात्र ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तगादा लावू नकोस, अन्यथा देवाचा कोप होईल; खरातने कांदा व्यापार्यालाही धमकावले
‘ते’ डॉक्टर कोण?
गर्भपात प्रकरणातील गुन्ह्यात खरातची पोलीस कोठडी (Police Custody) ८ एप्रिल रोजी संपत आहे. या गुन्ह्यात शहरातील दोन ते तीन बड्या डॉक्टरांची ‘एसआयटी’ ने चौकशी केल्याची खात्रीलायक माहिती आहे. गर्भपाताच्या गोळ्या कुणी उपलब्ध करून दिल्या आणि या कृत्यात सहभागी असलेले पांढरपेशी चेहरे कोण, याचा खुलासा करण्यासाठी आता पोलिसांकडे केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे या प्रकरणात ‘एसआयटी’ न्यायालयात काय पुरावे सादर करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरात फाईल्स प्रकरणी एसआयटीचे ‘मौनव्रत’; तपासाच्या गोपनीयतेवर संशयाचे मळभ
प्रश्न अद्याप अनुत्तरीत…
खरातच्या फार्म हाऊसवर झडतीदरम्यान पिस्तूल, २१ जिवंत काडतुसे आणि ५ रिकामी पुंगळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. या शस्त्रांचा वापर’ नरबळी, खून की अन्य कोणाचे प्राण घेण्यासाठी झाला होता ? या गंभीर प्रश्नाचे उत्तर शोधण्यात ‘एसआयटी’ ला अद्याप यश आलेले नाही. केवळ चौकशीचे फेरे घेण्यापेक्षा ठोस कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : खरातच्या मालमत्तेची ईडी चौकशी होणार – मुख्यमंत्री फडणवीस





