नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत (Bhadrakali Police Area) अवैध व्यवसायांच्या विळख्यानंतर आता गुंडांच्या दहशतीचे सत्र सुरू झाले आहे. जुने नाशिकमधील शिरीषकुमार चौक परिसरातील समर्थ केंद्र मैदानाजवळ संशयित श्रीजय संजय खाडे याने भररस्त्यात राडा घालत चार वाहनांची (Vandalized) नाहक तोडफोड केली. इतकेच नव्हे तर, विरोध करणाऱ्या नागरिकांवर आणि परिसरातील घरांवर दगडफेक करून दहशत निर्माण केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, भद्रकाली पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी
श्रीजय संजय खाडे याने (दि. ११) पहाटे तीन वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्राच्या मैदानात येऊन जोरजोरात शिवीगाळ व ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने पार्कंगमधील वाहनांना लक्ष्य केले. फिर्यादी निलेश काशिनाथ राऊत यांची सिव्हीक कार, हरीश कदम यांची इनोव्हा, कुणाल देवरे यांची बोलेरो पिकअप आणि आणखी एक अशा एकूण चार वाहनांवर दगडांनी प्रहार करत काचा फोडून नुकसान केले. राऊत यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संशयिताने त्यांच्यावरही दगडफेक केली. आजूबाजूच्या घरावर दगडफेक केल्याने नागरिक भयभीत झाले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरात प्रकरणात ईडीची नाशिकसह ११ ठिकाणी छापेमारी; मिरगाव जवळील फार्म हाऊसवरही सर्च ऑपरेशन
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या (Bhadrakali Police Station) हद्दीत जुगार, अवैध दारू विक्री आणि अमली पदार्थांचे जाळे आधीच विस्तारलेले आहे. या अवैध व्यवसायांचा त्रास नागरिक मुकाट्याने सहन करत असतानाच, आता टवाळखोरांनी थेट नागरिकांच्या जीवावर उठण्याचे धाडस केले आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत. रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याऐवजी पोलीस केवळ घटना घडल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या अड्ड्यातून ‘मळकट द्रव्य’ जप्त; न्यायालयीन कोठडी की पुन्हा कोठडी? आज ‘व्हीसी’द्वारे फैसला
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
गुन्हा दाखल होऊनही संशयित पसार असल्याने प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. वरिष्ठ निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी, संशयितांना कायद्याचा चोप मिळत नाही, तोपर्यंत नागरिक सुरक्षित राहतील का? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : Nashik MHADA Fraud : म्हाडा घरकुल फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; आयुक्त गेडाम-कर्णिक यांच्यासह सहा जणांचा समावेश




