नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात सध्या उन्हाचा तडाखा वाढत असतानाच, सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) नाशिककरांना (Nashik) घाम फोडणारी नवी शक्कल लढवली आहे. नाशिक महानगरपालिकेचा अधिकृत लोगो (चिन्ह) वापरून शेकडो नागरिकांना व्हॉट्सॲपवर ‘थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी भरा, अन्यथा कनेक्शन तोडले जाईल’ असे मेसेजेस करुन धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यानंतर झोपेतून जागे झालेल्या महानगरपालिका प्रशासनाने सायबर पोलिसांचे दार ठोठावून प्रकरणाची फिर्याद नोंदविली आहे.
हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.५) ६००५४८१७४६ आणि ६२९७०१९७९२ या दोन व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून इंग्रजी भाषेत मेसेजेस पाठवण्यात आले. या मेसेजेसमध्ये अत्यंत चलाखीने नाशिक महानगरपालिकेचा अधिकृत शहरातील असंख्य नागरिकांना लोगो डीपी म्हणूण वापरण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना हे मेसेज पालिकेच्या अधिकृत विभागाकडूनच आल्याचे दाखविण्यासाठी सायबर चोरट्यांनी हा उद्योग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हे देखील वाचा : Nashik Bribe Crime : नाशिक झेडपीत लाचखोरीचा ‘व्हायरस’; ठाकरेंनंतर पेसांतर्गत शिक्षण विभागाचा बहाद्दर ‘एसीबी’च्या जाळ्यात
“तुमची पाणीपट्टी आणि घरपट्टीची बिले प्रलंबित आहेत. ती त्वरित भरली नाहीत तर तुमचे कनेक्शन खंडित केले जाईल.” बिल अपडेट करण्यासाठी अंकित अग्रवाल यांच्याशी ६२९७०१९७९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही संशयितांनी मेसेजमध्ये उल्लेखित केले. दरम्यान, याआधी अशाच पद्धतीने वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी, एमएनजीएल, ट्रॅफिकचे ई चलानचे मेजेस व लिंक पाठवून अनेकांचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले आहेत. हाच फंडा वापरुन सायबर संशयितांनी नाशिकरांना पाणीपट्टी व घरपट्टीती बिले भरण्याचे मेसेज पाठवून काही तासांनी एपीके फाईल्स वा लिंक पाठवून नाशिककरांचे बँक खाते (Bank Account) रिकामे करण्याचा डाव रचला होता का, यादृष्टीने आता सायबर पोलिस तपास करत आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : नाशिककरांना दिलासा; शहरातील वृक्षतोडीला ‘या’ तारखेपर्यंत राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती
ट्रेडमार्क ॲक्टनुसार गुन्हा
नाशिक महानगरपालिकेची ओळख चोरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे लक्षात येताच पालिकेच्या प्रतिनिधीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, बीएनएस कलम, आयटी अॅक्ट आणि ट्रेडमार्क अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय पिसे तपास करत आहेत.
अशी टाळा फसवणूक
- कोणत्याही बिलाचा भरणा पालिकेच्या अधिकृत केंद्रावर किंवा अधिकृत वेबसाइटवरच करा.
- अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणत्याही व्यक्तीला ओटीपी देऊ नका.
- विश्वास संपादन करण्यासाठी सरकारी लोगोचा वापर, त्यामुळे केवळ डीपी पाहून विश्वास ठेवू नका.
- असे मेसेज आल्यास पोलीस स्टेशनला कळवा किंवा १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तब्बल ११२ पतसंस्था ‘सहकार’च्या रडारवर! सिन्नर-कोपरगाव-शिर्डी पट्ट्यात चौकशी




